आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रेल्वे प्रवाशांना लुटणारी बिहारी भामट्यांची टोळी जेरबंद

Spread the love

पुणे: फरासखाना पोलिसांनी रेल्वे तिकीट बुक करण्याच्या बहाण्याने प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या बिहार राज्यातील १० जणांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ५,७७,१९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २५ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्यादींच्या वडिलांचा अपघात झाल्याने ते आपल्या मूळगाव बिहारला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकिंग खिडकीत चौकशी करत होते.

त्यावेळी एक अनोळखी इसम फिर्यादीजवळ येऊन, “मी ऑनलाईन तिकीट काढून देतो, माझे मामा रेल्वे खात्यामध्ये काम करतात,” असे सांगून त्यांचा मोबाईल फोन, बँकेचे ए.टी.एम. कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्डची मागणी केली.

फिर्यादींना मारहाण करून बँक खात्याचा पासवर्ड जबरदस्तीने मागून, मोबाईल फोन, बँकेचे ए.टी.एम. कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रोख रक्कम घेऊन आरोपी पळून गेले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने २५ आणि २६ ऑगस्ट रोजी फिर्यादीच्या ए.टी.एम. कार्डचा गैरवापर करून वेळोवेळी फिर्यादींच्या खात्यातून तीन लाख रुपये काढले.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन फरासखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.

तपास पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपास पथकातील पोलीस अमलदार गजानन सोनुने आणि महेश राठोड यांना गुप्त माहिती मिळाली की, गुन्हे करणारे परप्रांतीय संशयित इसम डुल्या मारुती चौकात उभे आहेत.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन राजा युनुष पिंकू (वय १९ वर्षे, रा. बिहार) आणि मोहम्मद सुलतान मोहम्मद तौहिद शेख (वय १८ वर्षे, रा. बिहार) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

तसेच मुख्य सूत्रधार मुन्ना जोधन साह (वय ४१ वर्षे, रा. बिहार) आणि इतर साथीदारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४१ मोबाईल फोन, १,४३,०२०/- रुपये रोख, तसेच विविध एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असा एकूण ५,७७,१९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींनी बिहारमधून येऊन पुण्यात दहिहंडी आणि गणेशोत्सवाच्या काळात गुन्हे केले. ते रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना लुटत होते.