आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढव्यातील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, ५ जणांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 24, 2024
Spread the love

कोंढव्यात बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य असा ३६ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

कोंढव्यातील “मॅश” हॉटेलमध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आले आहे. कोंढवा पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई करून ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील राहुल रासगे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, हॉटेल मालक अली ईरानी (वय ६६, रा. होले हाईट्स सोसायटी, उंड्री), हॉटेल मॅनेजर अली सय्यद (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), हुक्का भरणारे थॉमस सुजय मंडल (वय ३०, रा. उंड्री, मूळ प. बंगाल), रंजन समर्थ पत्रा (वय २७, रा. मॅश हॉटेल, उंड्री), राजकुमार वामन पंडित (वय ३०, रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पाच जणाना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गावडे, हवालदार हिरवे, पोलीस अंमलदार चिंचकर, राहुल रासगे हे पेट्रोलिंग करताना कडनगर येथे आले होते.

त्यावेळी पोलीस अंमलदार चिंचकर यांना बातमी मिळाली की, न्याती चौकाजवळील रायजिंग स्टार फुटबॉल क्लबच्या शेजारील मॅश हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का विक्री चालू आहे. पोलिसांनी रात्री छापा घातला.

त्यावेळी हॉटेलमध्ये ३ टेबलांवर ८ जण हुक्का पित असल्याचे आढळून आले. हॉटेलमधील कॉटेज शेजारी असलेल्या छोट्या रूममध्ये आणखी काचेचे ४ छोटे हुक्का पॉट मिळून आले. पोलिसांनी हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य असा ३६ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे करीत आहेत.