आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लोहगावात साडेपाच लाखाच्या दागिन्यांची चोरी

Spread the love

पुणे : लोहगाव परिसरात बंद घराचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका ५२ वर्षांच्या महिलेने (रा. फॉरेस्ट रोड, लोहगाव) फिर्याद दिली आहे. ही घटना २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत सर्वे नं. १६७, लेन नं. जी २, संतनगर टी.व्ही.एस. शोरूमजवळ, फॉरेस्ट रोड, लोहगाव येथे घडली आहे.

फिर्यादी या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना, अज्ञात व्यक्तीने लोखंडी दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून तसेच मुख्य लाकडी दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला.

घरातील हॉलमध्ये असलेल्या लाकडी कपाटात ठेवलेले ५,१२,५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ५०,००० रुपयांचे चांदीचे दागिने, आणि १२,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५,७४,५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार यू.आर. धेंडे करीत आहेत.