शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विधानसभा निवडणूक लवकरच होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ८ मतदारसंघांतून राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) निवडणूक लढवणार असल्याचा दावा पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला आहे.
सध्या अनेक नेते व कार्यकर्ते पक्षांतर करताना दिसत आहेत. पर्वती मतदारसंघात रासपची बैठक पार पडली, जिथे भाजप आणि काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला. धनकवडी येथे आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्या उपस्थितीत, कार्यकर्त्यांनी रासपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
यावेळी पवार यांनी पुण्यातील ८ मतदारसंघांतून रासप निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पुण्यात रासपची मोठी ताकद आहे. ओबीसी, धनगर, मराठा समाज, तसेच महादेव जानकर यांचे अनुयायी यांमध्ये मोठा वर्ग आहे.
पुण्यात रासपने अनेक कामे केली असून, आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. पवार यांनी सांगितले की, ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत, आणि महादेव जानकर यांनीही त्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला मतदारसंघात रासपची मोठी ताकद असून, महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे.

