पुणे पोलिसांच्या अथक तपासाला मिळाले यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: बोपदेव घाटात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. या प्रकरणात एका आरोपीला वारजेतून अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित दोन आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आणि त्यातील दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी घडली होती. तपासात वेळ लागल्याने पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.
मात्र, आठव्या दिवशी पोलिसांना यश मिळाले. संशयिताला वारजे येथून अटक करण्यात आली असून, त्याचे दोन्ही साथीदारांच्या मागावर पोलिस आहेत. गुन्ह्यापूर्वी आरोपी एका वाईन शॉपमध्ये मद्य घेण्यासाठी एकत्र आले होते, आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासात समोर आलं आहे. या फुटेजवरून पीडितेच्या मित्राने आरोपींची ओळख पटवली, ज्यामुळे ही कारवाई शक्य झाली.
अख्तर, सोम्या, आणि चंद्रशेखर अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. बोपदेवमध्ये तरुणीवर अत्याचार करणारे हे तिघे सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तसेच त्यातील एका आरोपीवर बलात्काराचा गुन्हाही दाखल आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी २० किमी अंतरासाठी ८० किमीपेक्षा जास्त प्रवास केला. पोलिसांनी सांगितलं की, हे तीनही आरोपी मध्य प्रदेशचे असून मागील काही वर्षांपासून पुण्यात कचरा वेचण्याचे काम करत आहेत.
बोपदेव घाटातील घटनेच्या रात्री, तिन्ही आरोपींनी येवलेवाडी येथील बिअर शॉपमधून मद्य घेतले आणि नंतर बोपदेव घाटात जाऊन पीडित तरुणीवर अत्याचार केला. गुन्हा केल्यानंतर ते खेड शिवापूरकडे गेले. पोलिसांना चकवण्यासाठी, त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि रात्रभर भटकत राहिले.
या काळात त्यांनी मोबाइलचा वापर केला नव्हता. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आणि ७०० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
