महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) यांच्या संकल्पनेतुन व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली दिपावली सणानिमित्त “दिवाळी मेळावा” कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, यांच्या हस्ते (दि.२६ ऑक्टोबर) रोजी करण्यात आले.
“सुधारणा व पुनर्वसन” हे कारागृह विभागाचे ब्रीद असुन कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो. त्यामुळे निश्चितच त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात व त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कैद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते.
त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानूसार विविध सणांचे औचित्य साधुन कैद्यांनी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील दिवाळी सणानिमित्त कैद्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
प्रदर्शनामध्ये सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तु, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, बिस्कीट, आकाश कंदील तसेच इतर सर्व दैनंदीन वापराच्या वस्तु उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
प्रदर्शन व विक्रो मेळाव्यास सामान्य नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सामान्य नागरीकांना अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या कारागृह कैद्यांनी निर्मित विविध वस्तु उपलब्ध असुन त्याचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक यांनी उद्घाटन कार्यक्रमादरम्यान केले.
सदर कार्यक्रमास सुनिल डमाळ, अधीक्षक, पल्लवी कदम, अतिरिक्त अधीक्षक, डॉ. बी. एन. डोले, उपअधीक्षक, आर ई गायकवाड, उपधीक्षक, मंगेश जगताप, आनंदा कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, सुपमा चव्हाण, कारखाना व्यवस्थापक, बी एम शिंदे, कारखाना तुरुंगाधिकारी, सो आर सांगळे, तुरुंगाधिकारी, येरवडा मध्यवर्ती कारागृह व इतर अधिकारी/तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
