आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider • October 28, 2024
Spread the love

पुणे : डेक्कन पोलिस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पुण्यातील डेक्कन परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामुळे चार चोरटे जखमी झाले आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या कारवाईत एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी रात्री २.३० च्या सुमारास, डेक्कन पोलिस स्टेशन मधील मार्शल ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार महेश तांबे आणि गणेश सातव हे रात्री गस्त घालत असताना अभिनव विद्यालय मार्ग, जानकी व्हिला बंगल्यासमोरील रस्त्यावर त्यांना दोन संशयित इसम दिसले. त्यांना विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते.

त्यांनी आपल्या साथीदारांना हाक दिल्यानंतर त्यांच्या चार साथीदारांनी अंधारात धारदार शस्त्रांसह बंगल्याच्या आवारात दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेले होते. बंगल्याच्या गेटवरून उड्या मारून बाहेर येत त्यांनी धारदार शस्त्रांनी पोलिसांवर हल्ला केला.

या हल्ल्यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी पोलीस अंमलदार महेश तांबे यांनी पायाच्या दिशेने फायरींग केले. त्यावेळी चोरटे अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता, चोरटे संभाजीनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आसिफ हरूनखाँ गोलवाल (वय २४ वर्षे) याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याच्या साथीदारांनी हीच घटना केली असल्याची कबुली दिली. चोरट्यांमध्ये फारुकखाँ कादीरखाँ पठाण आणि शाहरुखखाँ कादीरखाँ पठाण हे फायरींगच्या वेळी जखमी झाले असून सध्या फरार आहेत.

सदर कारवाई डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने पार पाडली.