आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

माजी आमदार राहुल मोटे यांचे भूममध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

Spread the love

भूम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार राहुल मोटे यांनी सोमवारी (ता. २८) परंडा मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी भूम येथील नगरपालिकेसमोरील चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासह आम्ही मिळून येत्या चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारीचा तिढा नक्की सोडवू, असे मत व्यक्त केले.

पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना सीना कोळगाव प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाला योग्य दर मिळत नाही, कांद्याला देखील दर नाही. सरकारने मोठ मोठे उद्योग गुजरातला नेले, महाराष्ट्राला मात्र दुर्लक्षित केले आहे.

यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी आणखी मोठे उद्योग आणण्याचे आश्वासन दिले आहे. लाडकी बहिण योजना याच सरकारने बंद केली, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या सर्व योजना बंद होतील, असे महायुतीकडून अपप्रचार केला जात आहे.

यावेळी माजी आमदार राहुल मोटे, वैशाली मोटे, तसेच इतर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सभेला मधुकर मोटे, रणजित मोटे, संजय पाटील, राजेंद्र घरत, रूपेश शेंडगे, सिराज मोगल, विनोद नाईकवाडी, हनुमंत पाटोळे, सतीश सोन्ने, आदिनाथ पालके, प्रवीण खटाळ यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.