आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ठाणे कारागृहात दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन

Spread the love

ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी दिवाळी सणानिमित्त तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते पार पडले.

योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली “दिवाळी मेळावा” उत्साहात साजरा करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमास राणी रा. भोसले, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह तसेच कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी आणि अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी देखील माणूस असून तो समाजाचा एक घटक आहे. कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावे, या हेतूने कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

महिला कैद्यांकडून आकर्षक पणत्या, तोरणे आणि हस्तकलेच्या वस्तू तयार करण्याचे प्रयत्न करण्यात येतात, तर पुरुष बंद्यांकडून आकाशकंदील तयार केले जातात. यामध्ये सत्संग फाउंडेशन आणि वात्सल्य ट्रस्ट या अशासकीय संस्थांचे योगदान आहे.

जिल्हाधिकारी यांनी या वस्तूंचे कौतुक करून सर्व जनतेला या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. कैद्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व प्रशिक्षणाबद्दल कारागृह प्रशासन आणि अशासकीय संस्थांचे अभिनंदन करण्यात आले.

या माध्यमातून दिवाळीच्या आनंदाच्या सणानिमित्त कैद्यांच्या आयुष्यात आशेचा आणि आनंदाचा प्रकाश पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व बंदी बांधवांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन व विक्री केंद्रात मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची पाहणी केली आणि त्यातल्या अनेक वस्तूंची खरेदी केली.