विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी येथील कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत भाऊ आणि बहिण दरवाजा लॉक झाल्यामुळे अडकले होते. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता, आतमध्ये भाऊ-बहिण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.
मानसिक विवंचनेमुळे त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तातडीने उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी भाऊ-बहिणीला जीवदान दिले आहे. वानवडीतील विकासनगर येथील कृष्ण कन्हैया सोसायटीत हा प्रकार घडला.
जवान घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांकडून माहिती मिळाली की, सदनिकेत भाऊ (वय १९) आणि बहिण (वय २४) घरगुती कारणांमुळे मानसिक तणावाखाली होते आणि जीवाचे बरेवाईट करण्याची भाषा करत होते. त्यांची आई बाहेर होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी तातडीने अग्निशमन उपकरणे वापरून, सुमारे दहा मिनिटांतच दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आत दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळल्यावर, जवानांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले, आणि लवकरच ते दोघेही बरे होतील असे डॉक्टरांनी सांगितले. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीचे प्राण वाचवू शकलो, हे जवानांसाठी समाधानकारक होते.
या बचाव कार्यात वाहनचालक दत्ता अडाळगे, सत्यम चौंखडे तसेच जवान सुभाष खाडे, सागर दळवी, निलेश वानखेडे, श्रेयस मेटे, महेश पांडे, सुरज हुलवान, हर्षवर्धन खाडे, अनुराग पाटील, रितेश मोरे यांनी सहभाग घेतला.
