आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खडकीचे पोलिसच शिरजोर, एसटी बसमधून येणारा गांजा पकडला

Spread the love

पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस खासगी वाहनांची तपासणी करत आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड जप्त केली जात आहे.

खासगी वाहनाने प्रवास केल्यास पकडले जाऊ, या भीतीने आरोपींनी एसटी बसमधून प्रवास करण्याचे ठरविले. गांजाचा उग्र वास लपवण्यासाठी त्यांनी चांगले पॅकिंग केले होते. मात्र, पोलिसांच्या खबर्यांनी दिलेल्या पक्क्या माहितीतून त्यांचा हा प्लॅन फसला. खडकी पोलिसांनी चर्च चौकात सापळा रचून गांजासह दोघांना पकडले.

अटक केलेल्यांची नावे जाबीर भिकन खाटीक (वय ३२, रा. वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि सुहेल अली जहीर अली शहा (वय २६, रा. चोपडा, ता. जि. जळगाव) अशी आहेत. त्यांच्याकडून १ लाख ५९ हजार १५० रुपयांचा, १० किलो ६१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना बातमी मिळाली होती की, शिरपूर येथून पुण्याकडे दोघेजण एसटी बसमधून गांजा घेऊन निघाले आहेत. या माहितीनुसार, पोलिसांनी शिरपूरहून येणाऱ्या एसटीची वेळ व मार्ग समजून घेत, जुना मुंबई – पुणे महामार्गावरील चर्च चौकात सापळा रचला.

शिरपूरहून आलेली बस चर्च चौकात थांबवून, बसमधील प्रवाशांची तपासणी केली. तपासणीत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या एका पॅकिंग केलेल्या बॉक्समध्ये गांजा आढळून आला. दोघांकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी पुण्यातून गोवा येथे गांजाची डिलिव्हरी देणार असल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, गुन्हे निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ, पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे, संदेश निकाळजे, प्रताप केदारी आणि आशिष पवार यांनी केली.