घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक, दागिने हस्तगत
वाघोली पोलिसांची यशस्वी कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दिवसा झालेल्या घरफोडीप्रकरणी वाघोली पोलिसांनी चोरट्याला अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३,३८,२०८/- रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशनमध्ये या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींनी तक्रार दिली होती की त्यांच्या घरातील कपाटातील सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, प्रितम वाघ, आणि विशाल गायकवाड यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेतले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने राहूल सुभाष राठोड (वय ३० वर्षे, रा. दत्तविहार, वडजाई, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) याच्याकडून चोरीस गेलेल्या मालामधील ४३ ग्रॅम ३६० मिलीग्रॅम वजनाचे, ३,३८,२०८/- रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आरोपीला अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि शिरीष भालेराव करीत आहेत. ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, प्रितम वाघ, आणि विशाल गायकवाड यांनी केली आहे.
