कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बोपदेव घाटातून खडी मशीन चौकाकडे जात असताना घाटातील वळणावर दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेला तरुण गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. भरधाव वेगाने जात असताना घाटातील दुसऱ्या वळणावर दुचाकी घसरली. मागे बसलेले गणेश रमेश राठोड (वय २७ वर्षे, रा. गवळी गोठा, केशवनगर, मुंढवा, पुणे) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार दिनेश रासकर तपास करीत आहेत.
