फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे सांगून पुण्यात आणून वेश्या व्यवसायात लावलेल्या पाच तरुणींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सुटका केली. या पाच तरुणींमध्ये, दोघींना त्यांच्या पतींनी पुण्यात आणून वेश्या व्यवसायात लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमी सौरभ बिश्वास (वय ३५, रा. मरगी गल्ली, क्रांती चौक, बुधवार पेठ; मूळ रा. बोनगाव, जि. चातपाडा, कोलकाता), कुंटणखाना व्यवस्थापक विक्रम आसीम बिश्वास (वय २३, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ), किकास उजल मंडोल (वय २१) आणि टॉनी युनुस मुल्ला (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फ्रिडम फर्म संस्थेचे प्रतिनिधी अब्राहम शशिकांत हेगडे, रेश्मा सुरेंद्र तुपकर, सिमा अजय आरोळे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती दिली होती.
त्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक संगिता जाधव, हवालदार रेश्मा कंक, सहाय्यक फौजदार कुमावत, छाया जाधव, हवालदार नदाफ आणि भुजबळ यांनी बुधवार पेठेत छापा टाकला. अब्राहम यांनी एका वाड्यातील घर दाखवले, जिथे दरवाजात कुंटणखाना चालिका सुमी बिश्वास बसली होती.
पोलिसांनी तपासणी केली असता पाच तरुणी आढळून आल्या. त्यापैकी एक तरुणीने सांगितले की, तिच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची असल्याने, तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठेत काम केल्यास जास्त पैसे मिळतील, असे सांगितले. त्यामुळे ती पाच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधून येथे आली होती.
दुसरी तरुणी म्हणाली की, ती मुंबईत घरकाम करत होती आणि जादा पैशांच्या आमिषाने तिला येथे आणण्यात आले. तिसरी तरुणी जयपूरहून येथे आली होती. चौथ्या तरुणीला तिच्या पतीने, टॉनीने, कुंटणखाना चालिकेकडे सांगून वेश्या व्यवसायात लावले होते.
पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय तरुणीशी विशाल मंडोलने लग्न केले होते. त्यानंतर, त्याने तिला गावाहून पुण्यात आणून वेश्या व्यवसायात लावले. ग्राहकांकडून मिळणाऱ्या ५०० रुपयांपैकी २५० रुपये सुमी बिश्वास व व्यवस्थापक विक्रम बिश्वास ठेवून घेत होते.
पोलीस निरीक्षक अजित जाधव पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल विभागाच्या पोलीस निरीक्षक संगिता जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, सहाय्यक फौजदार छाया जाधव, पोलीस हवालदार रेश्मा कंक, इम्रान खान नदाफ, आणि भुजबळ यांनी केली.