आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच ४ वाहनांसह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क, मुंबई विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उप-अधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क डी विभागाकडून २७ ऑक्टोबर २०२४ रोजी घोटावडे गावच्या हद्दीत आंबटवेट रोडवर दारूबंदी गुन्ह्यासाठी सापळा लावून टाटा कंपनीच्या एस गोल्ड या चारचाकी वाहन (क्र. MH 12 TV 5122) पकडले.

या वाहनातून गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारूचे एकूण १८ बॉक्स (८६६ सिलबंद बाटल्या) तसेच महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल असा एकूण ३ लाख ५५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली.

न्यायालयाने आरोपीस ३ दिवस एक्साईज कोठडी मंजूर केली. पुढील तपासात ४ नोव्हेंबर २०२४ रोजी कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ तपासासाठी छापा टाकण्यात आला असता, सदर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे विविध बॅण्डचे विदेशी मद्याचे एकूण १०,००० नग बनावट लेबलसह सापडले.

याची एकूण किंमत ८८,१६० रुपये आहे. या गुन्ह्यातील पुढील तपासात दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी शनिवार पेठ येथून बनावट लेबल छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मशीनसह एकूण ३० लाख २ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यात एकूण ३४ लाख ४५ हजार ५५० रुपयांच्या मुद्देमालासह एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभागाचे सचिन श्रीवास्तव, ई विभागाचे निरीक्षक शैलेश शिंदे, स. दु. नि. स्वप्नील दरेकर, स. दु. नि. सागर धुर्वे, जवान गजानन सोळंके, आणि जवान संजय गोरे यांनी केली आहे. पुढील तपास निरीक्षक सचिन श्रीवास्तव करीत आहेत.