आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून ३ पिस्टल ६ काडतूस जप्त

Spread the love

गुन्हे शाखा, युनिट-२ ची कारवाई

पुणे : सराईत गुन्हेगाराकडून ३ पिस्टल आणि ६ काडतुसे असा एकूण १,२२,४१०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखा, युनिट-२च्या पथकाला यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांना वेळोवेळी तपासून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-२ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार गस्त घालत होते. दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना गुप्त माहिती मिळाली की, गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर, गुलटेकडी, स्वारगेट, पुणे येथे दोन इसम पिस्टल/अग्निशस्त्रे घेऊन येणार आहेत.

सदर बातमी युनिट-२चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना कळविण्यात आली असता त्यांनी युनिटमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे, युनिट-२च्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत १) अविनाश पोपट मोरे (वय ३० वर्षे, रा. मेन बाजारपेठ, शिरवळ, पुणे) आणि २) क्षितिज भाऊसाहेब भोसले (वय २० वर्षे, रा. वॉटर कॉलनी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्या कडून ३ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह आणि ६ जिवंत काडतुसे असा १,२२,४१०/- रुपयांचा माल जप्त केला.

त्यांनी ही शस्त्रे विनापरवाना जवळ बाळगून विक्रीसाठी पुण्यात आणल्याची कबुली दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, युनिट-२, पुणे शहर करत आहेत.

ही कामगिरी गुन्हे शाखा, युनिट-२चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलिस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, आणि नागनाथ राख यांनी केली आहे.