आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एमपीडीए मधील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

Spread the love

पुणे : एमपीडीएमधील चार महिन्यांपासून फरार सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार किरण राजू खवळे (रा. गणेशनगर, अप्पर बिबवेवाडी) याला तडीपार करण्यात आले होते. तरी देखील त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू असल्यामुळे पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांनी चार महिन्यांपूर्वी त्याला स्थानबद्ध केले होते.

स्थानबद्धतेची माहिती मिळाल्यानंतर आरोपी चार महिन्यांपासून फरार होता. दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अमंलदारांनी तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे आणि पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार शिवाजी येवले यांना आरोपी फुरसुंगी येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीवरून बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदारांनी सापळा रचून स्थानबद्ध आरोपी किरण राजू खवळे याला ताब्यात घेतले. त्याला स्थानबद्धतेचा आदेश बजावून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, प्रशांत धोत्रे, संतोष जाधव आणि पोलीस अमंलदार ज्योतिष काळे, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.