स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, अमलदार सुधीर इंगळे, संदीप घुले, आणि सुजय पवार गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम युवराज उमाप हा पिस्तूल विक्रीसाठी कॅनॉल रोड, गुलटेकडी येथे मृदा सर्वेक्षण कार्यालयाच्या बाहेर उभा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर यांनी सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम युवराज उमाप (वय २४ वर्षे, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कडे ०१ गावठी पिस्तूल व ०२ जिवंत काडतुसे असा एकूण २१,०००/- रुपयांचा माल मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अमलदार सुधीर इंगळे, संदीप घुले, सुजय पवार, रमेश चव्हाण, तनपुरे, फिरोज शेख, दीपक खेदाड, हर्षल शिंदे, दुधे, मोराळे, आणि टोणपे यांनी केली आहे.
