देवदर्शनला जाणे पडले महागात
१ कोटी ३७ लाखांचे दागिने, रोकड घेऊन नोकर पसार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विश्वासाने नोकरावर सोन्या चांदीचे दुकान सोपवून मालक देवदर्शनाकरीता गेले. इकडे नोकराने १ कोटी ३७ लाख ८० हजार ९०० रुपयांचे १८६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व साडेतीन लाख रुपये घेऊन पसार झाला आहे. डुंगर राजू सिंग (वय २७, रा. मुळगाव कुंडा, जि. जेसलमेर, राजस्थान) असे त्या नोकराचे नाव आहे.
या प्रकरणी मतेश रणजीतमल जोधावत (वय ३५, रा. मंगळवार पेठ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथील वर्षा ज्वेलर्स या दुकानात ३ ते ८ नोव्हेंबर दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे दाजी नितीन पारेख यांचे पिंपळे गुरव येथे वर्षा ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे.
डुंगर राजू सिंग हा गेल्या ३ ते ४ वर्षांपासून या दुकानात मॅनेजर म्हणून काम पाहत होता. दुकानाचे सर्व आर्थिक व्यवहारही त्याच्या देखरेखीखाली चालत होते. दिवाळी झाल्यानंतर पारेख यांनी दुकानाचा सर्व कारभार डुंगर राजू सिंगवर सोपवून देवदर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. दुकान उघडणे व बंद करणे याची जबाबदारी डुंगरवर होती.
दिवाळीनंतर दुकानाला सुट्टी असल्याने ते बंद असल्याचे सामान्य वाटले. पण दोन दिवसांनंतरही दुकान उघडले न गेल्याने संशय उत्पन्न झाला. नितीन पारेख यांनी मतेश जोधावत यांना दुकानात जाऊन पाहण्यास सांगितले.
त्यांनी दुकान उघडले असता, १८६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि साडेतीन लाख रुपये रोकड असा १ कोटी ३७ लाख ८० हजार ९०० रुपयांचा ऐवज गायब असल्याचे आढळले. त्यामुळे नितीन पारेख यांचा विश्वासघात झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
