आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्याच्या रस्त्यावर आता पोलीसही नाहीत सुरक्षित

Spread the love

पुणे : रस्त्यावर रात्रीच्या वेळी बॅरिकेट लावून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या तरुणाने बॅरिकेटला धडक देऊन कारची तपासणी करणाऱ्या पोलिसांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

यामध्ये दोन पोलीस, कारचालक आणि स्पोर्ट्स बाईकवरील तरुणी असे चारजण जखमी झाले आहेत. रस्त्यावर आता पोलीसही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. ही घटना सोलापूर रोडवरील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या गेटसमोर मांजरी नाका येथे रविवारी पहाटे ५ वाजता घडली.

पोलीस अंमलदार संकेत नरेश गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, कारचालक चेतन सिंग आणि स्पोर्ट्स बाईकवरील सायली टिंगे अशी जखमींची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार स्पोर्ट्स बाईकचालक कार्तिक ढवळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी नाका येथे बॅरिकेट लावून नाकाबंदी सुरू होती. पोलीस एका कारची तपासणी करत होते.

त्यावेळी लोणी काळभोर टोल नाका येथून स्पोर्ट्स बाईकवरून कार्तिक ढवळे वेगाने आला. त्याने नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेटला धडक दिली. त्यावेळी तपासणी करत असलेले संकेत नरेश गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के आणि ज्यांच्या कारची तपासणी केली जात होती ते चेतन सिंग यांना जोरदार धडक बसली.

त्यात स्पोर्ट्स बाईकवरील तरुणी सायली टिंगे खाली पडून गंभीर जखमी झाली. त्यानंतर तो तेथून पळून गेला असून सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.