आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई..‌’

Spread the love

पुणे : विठ्ठल रूपाशी एकरूप झालेल्या संतांना ज्ञानदृष्टीने अनुभवास आलेला ज्ञानियांचा राजा विठ्ठल, त्याला मातृरूपात पाहताना केलेला हट्ट, त्याचे लेकुरवाळे वर्णन करणाऱ्या संतरचना ऐकून रसिकांनी भक्तीरसाची अनुभूती घेतली. निमित्त होते ‌‘विठू माऊली माझी‌’ या कार्यक्रमाचे!

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कार्तिकी एकादशी निमित्त (दि. 12) ‌‘विठू माऊली माझी‌’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून कार्यक्रमाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे.

प्रियल साठे, मेहेर परळीकर आणि सचिन इंगळे यांनी रचना सादर केल्या तर अमृता ठाकूरदेसाई, सचिन वाघमारे, डॉ. राजेंद्र दूरकर, केदार मोरे, राजेंद्र साळुंके यांनी साथसंगत केली. संगीत संयोजन सचिन इंगळे यांचे होते तर भावपूर्ण निरूपण रवींद्र खरे यांनी केले.‌

‘विठू माऊली माझी‌’ या कार्यक्रमाची सुरुवात ‌‘जय जय राम कृष्णी हरी‌’ या गजराने झाली. यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेला ‌‘रूप पाहता लोचनी‌’ अभंग ऐकताना रसिकांना त्या सावळ्या विठ्ठलाचे अनुपम दर्शन घडले.

संत जनाबाई यांच्या ‌‘विठू माझा लेकुरवाळा‌’ रचनेतून माऊलीरूपी विठ्ठल आपल्या संतरूपी अपत्यांची कशी काळजी घेतो याची प्रचिती आली. नियमांचे बंधन सांभाळणाऱ्या विठुरायाचे वर्णन दर्शविणारा ‌‘अनुपम्य मनोहर‌’ हा अभंग रसिकांना विशेष भावला.