महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विधानसभेच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीवरुन खडक पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले.
साहील मजिद खान (वय २७, रा. घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, लोहियानगर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना खडक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार साहील खान याच्याकडे पिस्टल असून तो भावसार मंगल कार्यालयाजवळ उभा आहे.
या बातमीची खातरजमा करण्यासाठी खडक पोलीस ठाण्यातील तपास पथक तातडीने तेथे गेले. पोलीस आणि साहील याची नजरानजर होताच पोलिसांना पाहून तो त्या ठिकाणाहून नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी पाठलाग करुन त्याला काही अंतरावर पकडले.
त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या कंबरेला ५० हजार रुपयांचे गावठी पिस्टल मॅगझीनसह व पॅन्टचे खिशात १ जिवंत काडतुस मिळाले. पोलिसांनी साहील खान याला अटक केली आहे.
ही कारवाई खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक राहुल गौड, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, शेखर खराडे, लखन ढावरे, सद्दाम तांबोळी, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगजे, उमेश मठपती, विश्वजीत गोरे, शोएब शेख, इरफान नदाफ यांच्या पथकाने केली आहे.
