बिबवेवाडी पोलिसांनी मॉडेलवर दाखल केला खंडणीचा गुन्हा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आलेल्या मॉडेलने बलात्काराची तक्रार करेन, अशी धमकी देऊन फोटोग्राफरकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या एका ४३ वर्षीय फोटोग्राफरने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी एका मॉडेलविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बिबवेवाडीतील फिर्यादीच्या फोटो स्टुडिओमध्ये ६ ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फोटोग्राफर असून त्यांचा स्वतःचा फोटो स्टुडिओ आहे. आरोपी महिला मॉडेल मुळची सोलापूरची रहिवासी असून सध्या नऱ्हे येथे राहते. तिला स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करायचा होता, म्हणून तिने फिर्यादीला पोर्टफोलिओ तयार करण्याची विनंती केली होती.
फोटोशूटसाठी ती ६ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादीच्या फोटो स्टुडिओमध्ये आली होती. त्यावेळी फिर्यादीने लगेच फोटोशूट होणार नसल्याचे सांगून ते नंतर करू असे सांगितले. त्यावर नाराज होऊन मॉडेलने “तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकी दिली आणि वारंवार पैशांची मागणी करू लागली.
तिच्या धमकीला घाबरून फिर्यादीने तिला २० हजार रुपये दिले. तरीही ती पुन्हा पैशांची मागणी करत होती आणि पैसे दिले नाहीत तर स्टुडिओत येऊन जीवे मारण्याची धमकी देत होती. त्यामुळे शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत तपास करत आहेत.
