महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान साहित्य व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, येथे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाला निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, प्रशिक्षण कक्षाचे नोडल अधिकारी बाळकृष्ण वाटेकर, २० मतमोजणी पर्यवेक्षक, २० मतमोजणी सहायक आणि २० मायक्रो ऑब्झर्व्हर उपस्थित होते.
मतमोजणी कक्षाची रचना, मतमोजणी टेबलची मांडणी, उमेदवार प्रतिनिधींच्या जागा याबाबत सविस्तर माहिती देऊन निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी मतमोजणीसाठी उपस्थित राहण्याची वेळ व आवश्यक सूचना दिल्या. प्रशिक्षणार्थींना मतमोजणी टेबलवर उपस्थित राहणाऱ्या मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व मायक्रो ऑब्झर्व्हर यांच्या कामांचे स्पष्टीकरण देण्यात आले.
तसेच १७ सी फॉर्मचा दुसरा भाग समजावून सांगण्यात आला, ज्यावर मतदानाची आकडेवारी नमूद केलेली असते. मतदान साहित्य (इव्हीएम मशीन, स्टेशनरी, लिफाफे) वितरण करणे व मतदान प्रक्रिया संपल्यानंतर साहित्याचे संकलन करणे यासाठी तयार करण्यात आलेल्या साहित्य वितरण पथकातील १२० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
कर्मचाऱ्यांची ३० पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये ४ व्यक्ती कार्यरत असणार आहेत. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नेमून दिलेल्या टेबलवर उपस्थित राहून मतदान केंद्राचे ईव्हीएम मशीन व स्टेशनरीचे वाटप करणे, वाटप करताना मतदान केंद्रांना त्याच केंद्राचे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मिळतील याची दक्षता घेणे, तसेच २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व साहित्य संकलित करणे, साहित्याचे संकलन करताना व्हीव्हीपॅटचे क्रमांक व सील तपासणे, आणि संविधानिक व असंविधानिक लिफाफे तपासणे याबाबत सूचना देण्यात आल्या.