गावठी दारु विक्री करणाऱ्या १९० जणांना अटक : जुगार खेळणारे ११४ जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील सर्व अवैध धंदे बंद असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला होता. त्याला वरिष्ठ अधिकारीही दुजोरा देत होते. असे असताना विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली.
महिन्याभरात केलेल्या कारवाईची माहिती गुन्हे शाखेने जाहीर केली आहे. याशिवाय शहरातील ३२ पोलीस स्टेशननेही त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. त्यामुळे अवैध धंदे खरेच बंद होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुन्हे शाखेने दारूबंदी कायद्यान्वये दाखल गुन्हे १६३, अटक आरोपी १९०, जप्त मालाची किंमत ३६ लाख ८५ हजार ३२४ रुपये; जुगार खेळणाऱ्यांवर कारवाईमध्ये दाखल गुन्हे १६, अटक आरोपी ११४, जप्त मालाची किंमत ३ लाख ७ हजार ४६० रुपये; अंमली पदार्थांवर दाखल गुन्हे ११, अटक आरोपी २४, जप्त मालाची किंमत १ कोटी ५७ लाख ८५ हजार ५१० रुपये; तडीपार सापडून आल्यावर केलेली कारवाईमध्ये दाखल गुन्हे १५, अटक आरोपी १०.
ही आकडेवारी केवळ गुन्हे शाखेने १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत केलेल्या कारवाईची आहे. याशिवाय, शहरातील ३२ पोलीस स्टेशनने केलेली कारवाई यापेक्षाही मोठी आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व अवैध धंदे बंद करण्याचा आदेश दिला होता.
त्यानुसार, आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व अवैध धंदे बंद असल्याचा दावा पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी करत होते. पण, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीत विघ्न आणणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
त्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती समोर आली आहे. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांत तब्बल ६ गावठी दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे वारजे माळवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेचे युनिट ४ चे पथक यांनी वारजेतील शिवशक्ती चौक या एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या कारवाया करून हातभट्टीची दारू पकडली. घोरपडे पेठेत जनरल स्टोअर्समधून गावठी दारूची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यावर खडक पोलिसांनी कारवाई केली.
गुन्हे शाखेने गेल्या महिन्याभरात २५ पिस्तुले आणि ३८ काडतुसे जप्त केली आहेत. त्याशिवाय, ८१ धारदार हत्यारे हस्तगत केली आहेत. १४ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. त्यात १२० गुन्हे दाखल केले असून, १२१ जणांना अटक केली आहे. याशिवाय, वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ३ हजार ८६९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गुन्हेगारांवर वचक राहावा, या अनुषंगाने गुन्हे शाखेकडून कोंबिंग, पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे. गुन्हे शाखेने इतकी मोठी कारवाई केली असेल, तर अन्य ३२ पोलीस स्टेशनमधील कारवाई किती मोठी असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
