खंडणीसाठी अपहरण झाल्याचे भासविले : एकाला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडीत जाधव यांचे अपहरण करुन त्यांचा खुन केला. त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर खंडणीचा बनाव करणाऱ्यास पोलिसांनी पकडले आहे. वैयक्तिक वादातून त्यांच्या शेजारी राहणार्या तरुणाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
पंडीत रामचंद्र जाधव (वय ५२, रा. जाधववाडी डॅमजवळ, नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे खुन झालेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे. सुरज मच्छिंद्र वानखेडे (वय २३, रा. पंडीत जाधव यांचे खोलीत, जाधववाडी, नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे खुन करणाऱ्याचे नाव आहे.
जाधव यांच्याकडे माग्गी नावाचा बैल असून त्याने अनेक बैलगाडा शर्यती जिंकल्या आहेत. त्यामुळे पंडीत जाधव हे बैलगाडा मालक म्हणून पंचकोशात प्रसिद्ध होते़. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की, पंडीत जाधव हे १४ नोव्हेंबरपासून बेपत्ता असून अज्ञात लोकाने त्यांच्या नातेवाईकांकडे पंडीत जाधव यांच्या व्हाटसअॅप नंबरचा वापर करुन त्यांचे नातेवाईकांकडे ५० लाख रुपयांची खंडणीची मागणी करीत आहे.
ही माहिती समजल्यावर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन माहिती घेतली. पंडीत जाधव यांच्या बंद मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन सीसीटीव्ही चेक केले. तसेच बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन सुरज वानखेडे याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या.
त्यावरुन मुळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सुरज वानखेडे व त्याचा मित्र रणजित कुमार (रा. बिहार) यांना पकडले. त्यांच्या चौकशीत खरा प्रकार समोर आला. सुरज वानखेडे हा पंडीत जाधव यांच्या शेजारीच रहात असे.
त्यांच्यात वैयक्तिक कारणावरुन वाद होता. त्यावरुन सुरज याने १४ नोव्हेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी परिसरात पंडीत जाधव यांचा दोरीने गळा आवळून खुन केला. पंडीत जाधव यांनी गाडी मागितली आहे, असे कुटुंबीयांना भासवून त्यांच्या गाडीमध्ये पंडीत यांचा मृतदेह टाकून तो खेड तालुक्यातील वहागाव येथील डोंगरावर नेला.
मृतदेह तेथे जाळून टाकून त्याची विल्हेवाट लावली. गाडी पुन्हा त्यांच्या घराच्या परिसरात लावली. त्यानंतर पंडीत जाधव यांच्या व्हॉट्सअॅपवरुन अपहरण केल्याचे व ५० लाख रुपयांची खंडणी मागणारा मेसेज नातेवाईकांना केला होता.
खंडणी विरोधी पथकाकडून हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले पाच सीमकार्ड व दोन मोबाईल जप्त केले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खून करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस हवालदार सुनिल कानगुडे, प्रदिप पोटे, किरण काटकर, प्रदिप गोंडाबे, किशोर कांबळे, किरण जाधव, अशिष बोटके, चंद्रकांत जाधव व तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.
