आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

देणेकरांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने केला अपहरणाचा बनाव

Spread the love

पुणे : शहरात सर्वत्र मतदान सुरु असताना तीन चार मुलांनी एका तरुणाचे हातपाय बांधून तरुणाचे अपहरण केल्याची पोलिसांकडे तक्रार येते. पोलीस तातडीने तपासाची चक्रे फिरवितात. तेव्हा अपहरण झालेला तरुण लोहगाव येथे एका झाडाखाली बसून चक्क डबा खात असल्याचे आढळून येते. जंगली रमीच्या नादातून तो कर्जबाजारी झाला होता. त्यातून देणेकरांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले.

याप्रकरणी एका ६१ वर्षाच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते घरी असताना त्यांच्या ४३ वर्षाच्या मुलाच्या मोबाईलवरुन फिर्यादीचा मोठा मुलगा याला त्याच्या मोबाईलवर फोन आला.

त्याचे हात पाय बांधून तीन चार अनोळखी मुलांनी पकडून घेऊन निघाले आहेत, असे कळविले असून या लोकांनी मुलाचे अपहरण केल्याचे सांगितले. मुलाच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यात आले.

ते लोहगाव परिसरात असल्याचे दिसून आले़ पोलीस उपायुक्त आर राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी व त्यांचे पथक लोहगाव परिसरात शोध घेऊ लागले.

तेथील एका झाडाखाली हा तरुण चक्क एकटाच डबा खात बसल्याचे दिसून आले. डबा खाता खाता तो जंगली रम्मी खेळत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. हा ४३ वर्षाचा तरुण बी जे शिर्के कंपनीत अँगल कटिंगचे काम करतो.

त्याला जंगली रमी खेळण्याचा नाद लागला आहे. त्यासाठी त्याने मित्र, नातेवाईकांकडून थोडे थोडे करीत साडेतीन लाख रुपये उसने घेतले. आता हे लोक पैसे परत मागण्यासाठी घरी येऊ लागले.

त्यातून भांडणे होऊ लागली होती़ काही जणांनी पैसे दिले नाही तर मारण्याची धमकीही दिली होती़ तेव्हा त्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने अपहरण झाल्याचा बनाव रचला व मोठ्या भावाला फोन केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत.