आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लघुशंका केल्यावरुन कोथरुडमध्ये हाणामारी

Spread the love

पुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथील कंपनीच्या शेडमध्ये एकाने लघुशंका केल्याने झालेल्या वादात दोन गटात मोठी मारामारी झाली. त्यात बिअरची बाटली फोडून एकमेकांना मारल्याने त्यात ६ जण जखमी झाले. कोथरुड पोलिसांनी दोन्ही गटातील ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत महेश दर्गाप्पा तिग्मेले (वय २८,रा. भेलकेनगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आर्यन चटोले, प्रसाद भगवान मोरे, रुपेश चिंतामणी कानगुडे व रोहन ओव्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भेलकेनगरमधील महालक्ष्मी ऑटो इंजिनिअरींग वर्क्स येथे बुधवारी रात्री पावणे अकरा च्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा मित्र मच्छिंद्र मदन आरविले हे घराच्या बाहेरील परिसरात शतपावली करत होते. त्यावेळी आरोपी हे मोटारसायकलवरुन तेथे आले. त्यांनी महालक्ष्मी ऑटो इंजिनिअरिंगच्या शेडमध्ये लघुशंका केली.

त्याबाबत फिर्यादी महेश यांनी आरोपींकडे विचारणा केली असता तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या हनुवटीवर बिअरची बाटली फोडून जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी आलेले प्रदिप उत्तम पाडळे, जितेंद्र विठ्ठल भेलके, हनुमंत बोराटे, कुमार पिल्ले यांनाही बिअरची बाटली मारुन जखमी केले.

त्याविरोधात रुपेश चिंतामण कानगुडे (वय १९, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी महेश तिग्मेले (वय ३०, रा. भेलकेनगर, कोथरुड), जितेंद्र भेलके (वय ५०, रा. भेलकेनगर, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्यांचे मित्र महालक्ष्मी ऑटो इंजिनिअरींग वर्क्ससमोर दुचाकी पार्क करुन रस्त्याच्या बाजुला गप्पा मारत बसले होते. फिर्यादीचा मित्र रोहन ओव्हाळ याने महालक्ष्मी गॅरेज शेडमध्ये लघुशंका केल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली.

हाताने मारहाण केली.तसेच जितेंद्र भेलके याने फिर्यादीच्या कपाळावर बिअरची बाटली फोडून जखमी केले. हा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे करीत आहेत.