तडीपार असताना शहरात असलेल्या चुहा गँगकडून मेफेड्रॉन जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दंगली, दरोडा, जबरी चोरी, खंडणी अशा गुन्ह्यांमध्ये असलेली चुहा गँग आता अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतली असल्याचे समोर आले आहे. मोक्का प्रकरणात चुहा ऊर्फ तौसिफ याला न्यायालयाने २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. असे असताना तो साथीदारांसह दरोडा टाकण्यासाठी शहरात आला होता. आंबेगाव पोलिसांनी चुहा गँगच्या चौघांना पकडून त्यांच्याकडून अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
चुहा गँगकडून ३ लाखांची पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन, ४० हजार ५०० रुपयांचे पिस्टल, एक जिवंत काडतुस, मेफेड्रॉन विक्रीतून मिळविलेले ४ लाख ८० हजार रुपये, कोयता, दोन दुचाकी, एक कार असा १३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा माल जप्त केला आहे.
तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय २९, रा. रघुनंदन अपार्टमेंट, धानोरी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसिडेन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथील डिलाईट बेकरीसमोर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
तौसिफ ऊर्फ चुहा याच्याविरुद्ध जातीय दंगली, दरोडा, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला २०२० मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिली़ त्याच्यावर एकूण १५ गुन्हे आहेत़. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली होती.
या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी ६ नोव्हेंबर २०२३ पासून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते. असे असतानाही या तडीपारीचा भंग करुन शहरात आला होता. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांचे सहकारी संतोषनगर परिसरात गस्त घालत होते.
त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, डिलाईट बेकरीसमोर काही जण हत्यारासह दरोड्याच्या उद्देशाने येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. बातमीप्रमाणे तेथे आलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून मेफेड्रॉन, पिस्टल, जिवंत काडतुसे, रोख रक्कम, कोयता, दोन दुचाकी, एक कार असा १३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सुरेश शिंदे, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाह, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अविनाश रेवे, बाबासो पाटील, निलेश ढमढेरे यांनी केली आहे.
