आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तडीपार भावाने बहिणीवर उगारला कोयता

Spread the love

पुणे : पोलिसांनी तडीपार केल्यानंतर त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी वकिलाची व्यवस्था करण्यास नकार देणार्‍या बहिणीला मारण्यासाठी तडीपार भावाने कोयता उगारला. तिच्या घराजवळ दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्‍या या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे.

रवि मारुती चक्के (वय ३२, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. याबाबत त्याच्या ३२ वर्षाच्या बहिणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त आर राजा यांनी रवि चक्के याला १२ ऑगस्ट २०२४ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.

या तडीपारीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी वकिलाची व्यवस्था करण्यास रवि चक्के याने बहिणीला सांगितले होते. परंतु, तिने त्यास नकार कळविला होता. त्याचा राग मनात धरुन सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता तडीपारीचा भंग करुन रवि चक्के हा साडेसतरा नळी येथील घरी आला.

फिर्यादी बहिणीला शिवीगाळ करुन तिला मारण्यासाठी कोयता घेऊन तिच्या अंगावर धावून गेला. तो कोयता घेऊन येत असल्याचे पाहून त्याची बहिण घाबरुन पळून गेली. त्यानंतर रवि याने फिर्यादी व तिच्या घरच्या लोकांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

घराबाहेर येऊन हातातील कोयता हवेत फिरवून आजुबाजुच्या लोकांकडे पाहून ‘‘मी इथला दादा आहे, जर कोणी माझ्या आडवे आले तर एक एकाला बघुन घेतो,’’ असे जोरजोरात ओरडत होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन रवि चक्के याला अटक केली आहे. हा तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.