आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रेम प्रकरणातून मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप

Spread the love

पुणे : प्रेम प्रकरणात मदत करण्याऐवजी त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती प्रेयसीच्या घरी सांगितल्याच्या कारणावरून मित्राचा खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सुशांत रमेश ओंबळे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड, मूळ रा. विठ्ठलवाडी, पौड, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना पौड रोडवरील कलाग्राम सोसायटीत १० जुलै २०१८ रोजी घडली होती. सुशांत ओंबळे आणि अक्षय जोशी हे मित्र होते. घटनेच्या दोन वर्षांपूर्वी सुशांत ओंबळे आणि त्याच्या प्रेयसीचे प्रेम प्रकरण अक्षय जोशीने प्रेयसीच्या घरी सांगितले होते.

त्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणात अडथळे निर्माण झाले होते. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. हा राग सुशांत ओंबळेच्या मनात घर करून होता. सुशांतने मित्रांशी संगनमत करून अक्षय जोशीला कोथरुडमधील लोहिया आयटी पार्कच्या मागील कलाग्राम सोसायटीत बोलावले.

दारू पिल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास सुशांतने बिअरची बाटली फोडून ती अक्षयच्या गळ्यावर खुपसून त्याचा खून केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी सुशांत रमेश ओंबळे, प्रशांत रमेश ओंबळे (वय २५), महेश ऊर्फ सागर मुकुंद मेस्त्री (वय २९, रा. गुजरात कॉलनी, भेलके चाळ, कोथरुड) यांना अटक केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब शेवाळे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांच्या न्यायालयात झाली. पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळे आणि कोर्टातील महिला अंमलदार जगदाळे यांनी गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार आणि इतर आवश्यक पुरावे न्यायालयात सादर केले.

न्यायालयाने सुशांत ओंबळे याला जन्मठेप आणि ३० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब शेवाळे, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळे आणि कोर्टातील महिला अंमलदार जगदाळे यांनी ही कामगिरी केली आहे.