धुळ्याहून आला होता पुण्यात विक्रीसाठी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा १२ किलो गांजा पकडला. देव नरेश तनेजा (वय २४, रा. मोतीलाल आण्णानगर, मांडल शिवार, ता. शिरपूर, जि. धुळे) असे या तस्कराचे नाव आहे.
याबाबत पोलीस हवालदार संदिप शेळके यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना बातमी मिळाली की, कात्रज येथील एकता मित्र मंडळ चौकात एक जण गांजा घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून देव तनेजा याला पकडले.
त्याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा १२ किलो गांजा पकडला़ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक हा तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार संदिप शेळके, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, निलम पाटील यांनी केली आहे.
