आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने युवकाच्या चेहऱ्यावर पुन्हा फुलवले हास्य

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • December 2, 2024
Spread the love

पुणे ; आयुष्य अनिश्चिततेने भरलेले आहे, आणि एका अपघाताने ते कसे बदलून जाते, याचे उदाहरण म्हणजे दत्तात्रय अशोक विभुते. वयाच्या ३५व्या वर्षी अचानक घडलेल्या अपघातामुळे त्यांना आयुष्यातील कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. मात्र, आर. एम. धारीवाल फाऊंडेशनच्या मदतीमुळे त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद फुलला आहे.

दत्तात्रय अशोक विभुते (वय ३५, रा. सुरूल, ता. वाळवा, इस्लामपूर) हे कामावरून दुचाकीने घरी जात असताना अचानक जोराचा वारा वाहू लागला, आकाशात काळे ढग दाटले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. वारा आणि पावसाचा तडाखा टाळण्यासाठी त्यांनी झाडाखाली आश्रय घेतला. मात्र, वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे झाड त्यांच्या अंगावर पडले.

झाडाच्या बुंध्याखाली अडकलेल्या दत्तात्रय यांना काही वेळानंतर जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. डोक्यावर हेल्मेट असल्याने त्यांचे प्राण वाचले, परंतु त्यांच्या कंबरेखालील भाग गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना अपंगत्व आले. त्यामुळे ते चालण्यास आणि दैनंदिन कामे करण्यास असमर्थ झाले.

दत्तात्रय यांच्या परिस्थितीची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी आर. एम. डी. फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई धारीवाल यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शोभाताईंनी चेन्नई येथील ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर-कम-सायकल कंपनीशी संपर्क साधून त्वरित व्हीलचेअर उपलब्ध करून दिली.

दिवाळी भेट म्हणून प्रदान केलेल्या या व्हीलचेअरमुळे दत्तात्रय यांना आयुष्याचा नवीन मार्ग सापडला. या व्हीलचेअरचा वापर कसा करायचा, याबद्दल कंपनीच्या प्रतिनिधींनी दत्तात्रय यांना प्रशिक्षित केले. आता ते स्वतःची सर्व कामे स्वतः करू लागले आहेत. आपल्या नव्या जीवनासाठी त्यांनी आर. एम. डी. फाऊंडेशन आणि शोभाताई धारीवाल यांचे मनापासून आभार मानले.