सोमवार पेठेतील घटनेत पती जखमी, पत्नीवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पतीपत्नीतील भांडणे ही नेहमीच होतात, म्हणून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. आता हरभरा हे घोड्याचे खाद्य. अनेक पत्नी आपल्या पतीला घोडा, गाढव अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपमा देत असते. सोमवार पेठेतील एका घरात मोड आलेल्या हरभर्यांवरून पतीपत्नीत भांडण झाले. ते इतके विकोपाला गेले की पत्नीने चक्क पतीची जोरदार धुलाई केली. त्यात पती जखमी झाला आहे.
याबाबत अमोल गुलाबराव सोनवणे (वय ४४, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोनवणे यांच्या घरात रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पती व त्यांची पत्नी रविवारी रात्री घरी होते. त्यावेळी घरात मोड आलेले हरभरे अमोल याने खाल्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. पत्नीने पतीला शिवीगाळ करत तिच्या हातातील लाटण्याने अमोल याच्या डाव्या हाताच्या तळव्यावर मारले.
तसेच डोक्यात, पाठीवर मारले. हाताच्या नखांनी चेहर्यावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे, पोटाला वरखडले. त्यावेळी अमोल याने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. तेव्हा तिने मिक्सरचे भांडे उचलून डोक्यात दोन वेळेला मारले.
या भांडणात पत्नीने त्याची पॅन्ट खाली ओढल्याने ते खाली बसले. स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांनी दोन्ही हात वर केले. तेव्हा पत्नीने हाताची करंगळीला जोरात चावा घेतला. त्यात त्यांचे नख तुटले. समर्थ पोलिसांनी पतीच्या फिर्यादीवरुन पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
