१९ लाखांचे ओजीकुश गांजा, एम डी, एल एस डी जप्त
एकाचवेळी तीन वेगवेगळे अंमली पदार्थ जप्त, तिघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गांजा, एम डी, एल एस डी असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ बाळगलेल्या तिघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले असून त्यांच्याकडून १९ लाख ४५ हजार रुपयांचा ओजीकुश गांजा, एम डी आणि एल एस डी अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. सराफ लाईन, मिश्रा निवास, बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर, घाटकोपर, मुंबई), पियुश शरद इंगळे (वय २२, रा. चिखली, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक सोमवारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नर्हे येथील भुमकर चौकात तिघे जण अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत.
त्यानुसार पोलीस पथकाने तेथे सापळा रचला. घोडनदीकर टॉवरजवळ तिघे जण घुटमळताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्या झडतीमध्ये १७ लाख ४१ हजार रुपयांचा २५१ ग्रॅम वजनाचा ओजीकुश गांजा, १५ ग्रॅमचे एम ड व ६२ ग्रॅम चे एल एस डी असा अंमली पदार्थ व २ लाख ४ हजार रुपयांचा इतर ऐवज असा एकूण १९ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज मिळाला.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदिप शिर्के सचिन माळवे, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, सुजित वाडेकर, नुतन वारे, रेहाना शेख, विपुल गायकवाड यांनी केली आहे.
