उपांत्य आणि अंतिम फेरीत रोमांचक विजय, महाराष्ट्रातील कौतुकाचा वर्षाव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पुणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित 53 वी अंतर जिल्हा व 86 वी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडत आहे. ही स्पर्धा 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान होत असून, महाराष्ट्रातील टेबल टेनिस क्षेत्रातील ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते.
राजवर्धन तिवारी याने या स्पर्धेत अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरीत यशान कोलाह (मुंबई) याचा 3-2 असा पराभव केला. अंतिम फेरीत त्याने द्वितीय मानांकित वरदान कोलते (पुणे) याचा देखील 3-2 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आणि चॅम्पियनशिप विजेतेपदाला गवसणी घातली.
या यशामुळे राजवर्धनला राज्य मानांकनात अव्वल स्थान मिळणार असून, त्याने नॅशनल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. राजवर्धनच्या या यशाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. सोलापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनसह विविध क्रीडा संस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
राजवर्धनचे प्रशिक्षक गणेश स्वामी, जे बार्शी येथील रोटरी क्लब टेबल टेनिस अकॅडमीत त्याला प्रशिक्षण देत आहेत, त्यांनीही या यशासाठी त्याचे विशेष कौतुक केले. आगामी नॅशनल चॅम्पियनशिप जानेवारी 2025 मध्ये बडोदा, गुजरात येथे होणार आहे. राजवर्धनला या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
