कात्रजमधील संतापजनक घटना : सैन्य दलातील निवृत्त व्यक्तीने चार वर्षे केले अत्याचार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर पोलीस भरतीमध्ये मदत करण्याचे आमिष दाखवत, चार वर्षांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कात्रजमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी राजू परांदे (वय ४८, रा. कात्रज) या संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू परांदे हा सैन्य दलातून निवृत्त झालेला असून सध्या एका सैनिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करत आहे. कात्रजमध्ये त्याची पत्नी मेस चालवते, जिथे पीडित तरुणी नियमितपणे जेवणासाठी जात असे.
ओळखीचा फायदा घेत, आरोपीने तिला स्पर्धा परीक्षेत आणि पोलीस भरतीत मदत करण्याचे आमिष दाखवले व तिचा विश्वास संपादन केला. २०२० पासून २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला.
काही महिन्यांपासून तो तिला मारहाण व धमकी देत होता, तिचे जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका गोरे करत आहेत.
