कोथरुडमधील सुतारदरा येथील घटनेत संसारोपयोगी साहित्य जळून खाक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दोघा पतीपत्नीत भांडणे झाल्याने सासुने सुनेला माहेरी पाठविले. पत्नी माहेरी आल्याचा राग आल्याने जावयाने पाच मिनिटामध्ये घरी नाही आलीस तर तुझ्या आईचे घर जाळून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने खरोखरच आपल्या सासरच्या घराला आग लावून दिली. त्यात घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
याप्रकरणी कविता किसन फेंगसे (वय ४१, रा. काळुबाई कॉलनी, सुतारदारा, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहील हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुतारदरा येथील काळुबाई कॉलनीमध्ये गुरुवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कविता फेंगसे यांना तीन मुली असून त्यातील दोघींचा विवाह झाला आहे. तेजल हिचा साहील हाळंदे याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. तेजल हिची सासु कविता हाळंदे यांचा फिर्यादी यांना फोन आला. साहील हा कोणत्यातरी मुलीसोबत फिरतो आहे.
त्यामुळे तेजल व साहील यांचे भांडण झाले आहे. तरी तेजल हिला दोन तीन दिवसांसाठी माहेरी पाठविते, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तेजल सात महिन्यांच्या बाळाला घेऊन २६ नोव्हेंबर रोजी माहेरी आली. २८ नोव्हेंबर रोजी साहिलने तेजल हिला फोनवरुन भांडणे केली.
त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नव्हता. त्यानंतर त्यांनी २९ नोव्हेंबरला भरोसा सेल येथे साहील हाळंदे याच्याविरुद्ध तक्रार अर्ज केला. मुलगा आजारी असल्याने ४ डिसेंबर रोजी रात्री उशिरा ते मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी साहिल याचा फोन आला.
आजारी मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याचे तेजल हिने सांगितले. तरी तो सतत फोन करत होता. रात्री सव्वा दहा वाजता साहील याचा फोन आला व तो धमकावू लागला. ‘‘आताच्या आता तू इथे ये, मी तुझ्या आईच्या घरापाशी आलो आहे. तू पाच मिनिटांमध्ये जर घरी नाही आलीस तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन तसेच तुला पण बघुन घेईन,’’ अशी धमकी दिली.
त्यामुळे त्या घाबरुन मैत्रिणीच्या घरी गेल्या. त्यानंतर मध्यरात्री पाऊण वाजता त्यांना घराला आग लागल्याचे समजले. त्या घरी आल्या. तेव्हा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान त्यांच्या घराला लागलेली आग विझवत होते. या आगीमध्ये त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तु, कपाटे, कपडे, गाद्या, भांडी, टिव्ही व इतर सर्व घरातील वस्तु अर्धवट जळून खुप मोठे नुकसान झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत.
