कोथरुडमधील घटनेत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारु पिल्यानंतर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीत तिघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. कर्वेनगरमधील चांदणी बार ते कोथरुडमधील कोकण एक्सप्रेस दरम्यान घडलेल्या या घटनेत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
ओंकार विजय स्वामी (वय २७, रा. गगनगिरी कॉलनी, आशिष गार्डन, कोथरुड) हा तरुण या मारहाणीत बेशुद्ध पडला होता. डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर आता त्याची तब्येत सुधारत आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रकाश चव्हाण यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी हेमंत ऊर्फ लोकेश सुरेश माथवड (वय २९), शुभम रामभाऊ मोकाटे (वय २९, रा. ओमकार पुरम सोसायटी, आझादनगर, कोथरुड), नचिकेत ऊर्फ अजिंक्य गंगाधर ओव्हाळ (वय २६, रा. श्रावणधारा वसाहत, शिवतारा गार्डन, सोसायटी, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हा प्रकार शुक्रवारी पहाटे एक ते अडीच च्या सुमारास कर्वेनगर येथील चांदणी बार अँड रेस्टॉरंट ते कोथरुडमधील कोकण एक्सप्रेस दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदनी बारमध्ये दारू पिल्यानंतर आरोपी बारच्या बाहेर थांबले होते.
पहाटे एक वाजेच्या सुमारास त्यांचे ओंकार स्वामी याच्याशी वाद झाला. तेव्हा शुभम याने फरशी स्वामीच्या पाठीत घातली. हेमंत याने तेथील कुंडी उचलून मारली. तेव्हा ओंकार घाबरुन तेथून पळून जाऊ लागला.
आरोपींनी पाठलाग करुन त्याला कोकण एक्सप्रेसजवळ पकडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नचिकेत याने तेथे पडलेली सिमेंटची वीट उचलून स्वामीच्या डोक्यात मारली. तिघांनी स्वामीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हा प्रकार होत असताना रस्त्याच्या पलिकडे लोकांची गर्दी झाली. तेव्हा शुभम मोकाटे याने दुभाजकावर उभे राहून पलीकडे थांबलेल्या लोकांना हातवारे करुन त्यांना निघून जाण्यास सांगून दहशत निर्माण केली.
या मारहाणीमुळे ओंकार स्वामी बेशुद्ध पडला. पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील हा तपास करीत आहेत.
