आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जैन मंदिरात चोरी करणारा जेरबंद

Spread the love

पुणे : जैन मंदिरात जैन साधकाच्या वेशात जाऊन तेथील देवाचे दागिने चोरणार्‍या सराईत चोरट्यास जेरबंद करण्यात आले.

नरेश आगरचंद जैन (रा. गिरगाव, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. पैशांच्या चणचणीतून देवाचे दागिने चोरल्याने त्याने सांगितले. त्याच्याकडून चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन असा ४ लाख २० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

याबाबत जय परेश पारेख (रा. सिटीवुड सोसायटी, पुनावाला गार्डनसमोर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली होती. त्यांच्या घरातील जैन मंदिरातील देवाचे सोन्याचा मुकुट व सोन्याची चैन चोरीला गेली होती. त्याच दिवशी शहरातील ३ ते ४ जैन मंदिरामधील देवाचे दागिने चोरीचा प्रयत्न झाला होता.

कार्तिक पोर्णिमेनिमित्ताने जैन बांधव जैन मंदिरामध्ये समारंभपूर्वक पुजाअर्चा करतात. त्याच दिवशी चोर्‍या झाल्याने लोकांची धार्मिक भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी तातडीने विशेष तपास पथकाची निर्मिती करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या खबर्‍यांकडून माहिती काढली. त्याचवेळी पोलीस हवालदार सागर केकाण यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई, डोंबिवली व इतर परिसरात घडले आहेत.

संशयित आरोपी हा सध्या मुंबईतील गिरगाव येथील घरी आहे. त्यानुसार पोलिस पथक तातडीने मुंबई जाऊन धडकले़ त्यांनी नरेश जैन याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेले ४ लाख २० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.


नरेश जैन हा सराईत चोरटा असून राज्यातील बऱ्याच पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर आहे. त्याच्यावर यापूर्वीही घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवली इत्यादी भागात ८ ते १० ठिकाणी अशाच पद्धतीने जैन मंदिरांमध्ये गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा जैन असल्याने साधकाच्या वेशात मंदिरात जाऊन देवाचेच दागिने चोरी करत असल्याचे दिसून आले़.


ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक तानवडे, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सतीश कुंभार व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली आहे.