आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नगर जिल्हा हायटेक होतोय : डॉ. सुजय विखे पाटील
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचा ‘महा सिक्युरटेक एक्सपो’ मोठ्या उत्साहात पार पडला.
नाथकृपा सांस्कृतिक भवन येथे आयोजित या प्रदर्शनात देश-विदेशातील ३० हून अधिक नामांकित कंपन्यांनी आपली अत्याधुनिक सुरक्षा साधने, एआय-आधारित उपकरणे, सी.सी.टी.व्ही, ड्रोन कॅमेरे आणि विविध तांत्रिक साधनांचे सादरीकरण केले.
या प्रदर्शनाचे आयोजन आर-ईशा सिक्युरटेक प्रा. लि.चे एमडी व सीईओ राहुल मुथा यांनी केले. उद्घाटन समारंभाला अहिल्यानगर कॉम्प्युटर असोसिएशन, सी.सी.टी.व्ही असोसिएशन, तसेच टायटल स्पॉन्सर हिकव्हिजन, आरपी टेक आणि प्रामा यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नाशिक, संभाजीनगर, बीड, दिल्ली, गुजरात यां सारख्या विविध शहरांमधून व्यावसायिक व ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
एक्सपोला भेट देताना मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील हायटेक वाटचालीवर भर दिला. जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल स्मार्ट बोर्ड आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही बसवून जिल्हा हायटेक बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सी.सी.टी.व्ही, स्मार्ट डिजिटल बोर्ड, फायर अलार्म सिस्टम, बायोमेट्रिक यंत्रणा, ड्रोन, पावर सप्लाय आणि इतर उपकरणांना प्रात्यक्षिकांसह प्रदर्शित करण्यात आले. ग्राहक आणि व्यावसायिकांच्या विशेष मागणीनुसार मेड इन इंडिया उत्पादने प्राधान्याने खरेदी करण्यात आली.
यावेळी खासदार निलेश लंके, कडूभाऊ काळे, अमित बुरा आदी मान्यवरांनी प्रदर्शनाचे कौतुक करत अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक्सपोचे आयोजन दरवर्षी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आधुनिक सुरक्षा साधनांच्या वापरामुळे नगर जिल्हा हायटेक बनत असल्याचे प्रतिपादन करून, तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे ग्राहक व व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण होत असल्याचे मत प्रदर्शनात सहभागी कंपन्यांनी व्यक्त केले.
