आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गाड्यांच्या काचा फोडून माजविली दहशत

Spread the love

पुणे : आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणून त्यांना पाहिजे असलेला तरुण न मिळाल्याने टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा, कार यांच्या काचा फोडून सहकारनगरमध्ये दहशत माजविली.

श्रीरंग ज्ञानोबा शेलार (वय ५०, रा. हिलटॉप सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सौरभ ओतारी, सुमित दिघे (दोघे रा. धनकवडी) व त्यांच्या २० ते २५ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार सावरकर चौकातील हिल टॉप सोसायटी रोडवर रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ ओतारी, सुमित दिघे व त्यांचे २० ते २५ साथीदार हे कोणाचा तरी शोध घेत हिलटॉप सोसायटी परिसरात आले होते.

आरडाओरडा करत हातातील कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, जो कोणी आमचे समोर येईल व आमच्या नादाला लागेल, त्याला आम्ही सोडणार नाही, असे म्हणून लोकांच्या मनात दहशत निर्माण केली.

त्यांना हवा असलेला तरुण न मिळाल्याने चिडून त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी असलेली अशोक सुर्वे यांची रिक्षा याच्या पुढील काचा फोडल्या. सागर वाघिरे यांच्या कारच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडून कोयत्याने गाड्यांवर वार करुन नुकसान केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. हा तपास पोलीस हवालदार मानसिंग जाधव करीत आहेत.