आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिबट्या सदृश वन्य प्राण्याचा बंदोबस्त करा

Spread the love

बार्शी : बार्शी तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्या सदृश वन्य प्राण्याचा वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार दिलीप सोपल यांनी वन विभागाला तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

बार्शीतील वन अधिकारी अलका करे यांना दिलेल्या निवेदनात आमदार सोपल यांनी नमूद केले की, या वन्य प्राण्याने आतापर्यंत अनेक पाळीव जनावरांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जात असतात. अशा परिस्थितीत या बिबट्या सदृश प्राण्यामुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
आमदार सोपल यांनी वन विभागाने तातडीने बिबट्या सदृश प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी इतर जिल्ह्यांतील अनुभवी वन कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, अशी मागणी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाययोजना करून हा धोका दूर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.