सराईत गुन्हेगार अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय
पुण्यात ३ लाखांचा गांजा घेऊन येताना अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मोक्काची कारवाई यापूर्वी झालेल्या सराईत गुन्हेगाराकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. सहजरित्या मोठा माल मिळत असल्याने शरीराविरुद्ध गुन्हे असलेले गुन्हेगार आता अंमली पदार्थांच्या तस्करीकडे वळलेले दिसून येत आहेत.
साहिल विनायक जगताप (वय २८, रा. हनुमाननगर, केळेवाडी, कोथरुड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. साहिल जगताप हा सराईत गुन्हेगार असून तो येनपूरे टोळीमध्ये सक्रीय होता. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन साहिल जगताप व त्याच्या साथीदारांनी एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला होता.
सागर येनपूरे बरोबर तो गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी साहिल जगतापसह येनपूरे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर गेली दोन वर्षे साहिल जगताप याच्यावर पोलिसांची कारवाई नव्हती.
अंमली पदार्थ विरोधक पथक लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना माहिती मिळाली की, सोलापूर रोडवरील लोणी टोलनाक्याजवळ अंमली पदार्थ घेऊन एक जण येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी लोणी टोलनाक्याजवळील रेड्डी हॉटेल शेजारी सापळा रचला. तेथे आलेल्या साहिल जगताप याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडील सॅकमध्ये ३ लाख १३ हजार ८४० रुपयांचा १४ किलो १८२ ग्रॅम गांजा तसेच इतर ऐवज मिळून आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत खोसे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बांगर, भगत यांनी केली.
