कर्वेनगरमधील बँक ऑफ बडोदामधील घटना : सीसीटीव्हीत भामटा कैद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बँकेतून पैसे काढल्यानंतर ते मोजत असताना भामट्याने पैसे असे मोजायचे असतात, असे म्हणून महिलेच्या हातातून पैशांचे बंडल घेत मोजून दाखविण्याचा नाटक करत हातचलाखी करुन दोन बंडलातून २३ हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत वारजेमधील ४६ वर्षाच्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील काकडे सिटी येथील बँक ऑफ बडोदा शाखेत गुरुवारी दुपारी बारा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या पतीचे बँक ऑफ बडोदा मधील काकडे सिटी शाखेत करंट खाते आहे.
त्यांच्या पतीने बँकेतून २ लाख रुपये काढून आणण्यासाठी २ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. या धनादेशाद्वारे त्यांनी कॅशियरकडून २ लाख रुपये घेतले. बँकेतील कॅशियरच्या समोरील खुर्चीवर बसून त्या नोटांचे बंडल मोजत होत्या.
यावेळी त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या भामट्याने त्यांना नोटा अशा मोजायच्या नसतात, असे सांगून नोटा कशा मोजायच्या हे दाखवून देण्यासाठी त्यांच्याकडून ५०० रुपयांची बंडले घेतली. पत्याचा कॅटला जसा कट मारुतो तसा त्याने नोटांच्या बंडलला कट मारला व बंडलला परत दोरी लावताना हातचलाखी करुन दोन बंडलातील २३ हजार रुपये काढून घेतले.
त्यानंतर महिला घरी गेल्या. त्यांनी नोटा मोजल्या. तेव्हा त्यात २३ हजार रुपये कमी आढळले. त्या पुन्हा बँकेत गेल्या. तेथील सीसीटीव्ही तपासल्यावर नोटांच्या बंडलातील काही नोटा काढून घेत असताना हा भामटा त्यात कैद झाला. यावरुन पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करीत आहेत.
