महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नववर्ष स्वागत व पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये २५ डिसेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान केले आहेत.
रस्त्यावर किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा प्रकारे चालावे, त्यांची वर्तणूक कशी असावी याचे नियमन करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळेत काढाव्यात याचे निर्धारण करण्यासाठी आणि अडथळा होऊ नये म्हणून योग्य आदेश देण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक जागेवर सुव्यवस्था राखण्यासाठी, रस्त्यावर किंवा जवळ ढोल-ताशे व इतर वाद्ये वाजवणे, गाणी गाणे किंवा शिंगे व कर्कश वाद्ये वाजवण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आदेश देण्याचा अधिकार आहे.
लोकांना त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रसारक (लाऊडस्पीकर) वापरण्याचे नियमन करण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, घाट, धक्के, सार्वजनिक स्नानस्थळे, देवालये आणि अन्य सार्वजनिक जागी सुव्यवस्था राखण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
कलम ३३, ३५, ३७-४०, ४२, ४३ आणि ४५ अंतर्गत लागू असलेल्या आदेशांना पूरक व समर्थन करणारे आदेशही संबंधित अधिकारी देऊ शकतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशांचा उद्देश नववर्ष स्वागत व विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुनिश्चित करणे आहे.
