आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उधार चहा देण्यास नकार दिल्याने गुंडाचा राडा

Spread the love

पुणे : चहा उधारीवर न दिल्याने एका गुंडाने लोहगावमध्ये पान शॉप आणि अंडाभुर्जी गाडीवरील साहित्याची तोडफोड केली. विमानतळ पोलिसांनी मोक्का कारवाई झालेल्या या गुंडाला अटक केली आहे.

अक्षय संजय सगळगिळे (वय २०, रा. संतनगर, लोहगाव) असे या गुंडाचे नाव आहे. अक्षय सगळगिळे आणि रोहन चव्हाण यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी बुधवार पेठेतील तपकीर गल्लीत शिरून व्यावसायिकांना तलवारीचा धाक दाखवून लुबाडले होते.

याबाबत विशाल कैलास पालखे (वय २२, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १२ डिसेंबर रोजी सव्वा दहा वाजता लोहगाव येथील पोरवाल रोडवरील करण पान शॉपमध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सगळगिळे हा फिर्यादीच्या पान शॉपवर आला आणि त्याने चहा उधारीवर मागितला. मात्र, उधार चहा न दिल्याने त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. कोयता हवेत जोरजोरात फिरवून तो म्हणाला, “मी इथला भाई आहे. कुणाच्या बापाला घाबरत नाही. कोणी मध्ये आलं तर त्यांना खांडोळ्याशिवाय सोडणार नाही.”

यानंतर त्याने पान शॉपच्या काउंटरवर कोयता मारून दुकानातील साहित्याचे नुकसान केले. शेजारील गुंडू सुधाकर म्हस्के यांच्या अंडाभुर्जी गाडीवरील अंड्यांचे ट्रे फोडले, राईस फेकून दिला, लाइटचे बल्ब फोडले, आणि फ्रीजवर कोयता मारून तोडफोड केली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदन करत आहेत.