कामगाराला डोळा कायमचा गमवावा लागला : धनकवडीतील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सी एन जी पंपावर गॅस भरत असताना गॅसचे नोझल उडून तो डाव्या डोळ्यावर जोरात लागल्याने कामगाराला डावा डोळा कायमचा गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सी एन जी पंपावर रविवारी सायंकाळी साडेसहा च्या सुमारास घडला.
याबाबत हर्षद गणेश गेहलोत (वय २३, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मालक व मॅनेजर धैर्यशील पानसरे व राहीत हरकुर्की यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील तीन हत्ती चौकात एस स्क्वेअर हा सी एन जी पंप आहे. तेथे हर्षद गेहलोत हे गेल्या एक वर्षापासून काम करत आहे. ते कामावर असताना गाडीमध्ये सी एन जी गॅस भरत असताना गॅसचे नोझल उडून त्यांच्या डाव्या डोळ्याला जोरात लागल्याने ते जखमी झाले.
एस स्क्वेअर सी एन जी पंपाचे मालक व मॅनेजर धैर्यशील पानसरे व राहीत हरकुर्की यांनी फिर्यादी यांना कामाला ठेवून घेतले. त्यांच्या जीवीताच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना केली नाही. त्यामुळे त्यांना त्यांचा डावा डोळा कायमचा गमवावा लागला़. हा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.
