महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी: सुलाखे हायस्कुलचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने त्यांना पहिला “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान केला. शैक्षणिक, संख्यात्मक आणि भौतिक प्रगतीत अल्प कालावधीत केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे.
हा पुरस्कार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राचार्य हिरोळीकर प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सावंत यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार सुपूर्त केला. प्राचार्य हिरोळीकर यांनी पुरस्काराचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष, सचिव, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी यांना दिले.
या प्रसंगी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुरेश गुंड, राज्य संघटक समाधान घाडगे, ज्येष्ठ शिक्षक जयसिंग कदम, सूर्यकांत चोरमले, राजकुमार कुलकर्णी, किरण लांडे, हिरोळीकर कुटुंबीय आणि सावंत यांचे सहकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा हा पहिलाच जीवन गौरव पुरस्कार असल्याने या पुरस्काराचे महत्त्व अधिक वाढले आहे. प्राचार्य हिरोळीकर यांचे योगदान भविष्यातील शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरेल.
