सावधान ! तो सायबर चोरट्यांचा असू शकतो
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारने नुकतीच क्विक रिस्पॉन्स कोड म्हणजेच क्यू आर कोड असलेल्या पॅन कार्ड २.० ची घोषणा केली आहे. हे आपल्याला माहितीच असेल. या पॅन कार्डमध्ये मॅट्रिक्स बारकोड असणार आहे. त्यामुळे या पॅन कार्डचा वापर अधिक सुरक्षित होणार आहे. बनावट पॅन कार्ड बनविणे चोरट्यांना शक्य होणार नाही. बँका, आर्थिक संस्था आणि सरकारी कामासाठी पॅन कार्डची पडताळणी सुलभ होणार आहे. नव्या येणाऱ्या गोष्टीचा आपल्याकडे सायबर चोरटे गैरफायदा घेत असतात.
ज्या ज्या वेळी नव्या गोष्टी येतात, त्या त्या वेळी त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे लोकांमध्ये भिती पसरवितात. त्यातून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून गोपनीय क्रमांक काढून घेऊन फसवणूक करत असल्याचे दिसून आले आहे.
त्याचप्रमाणे आता सायबर चोरट्यांनी नव्या पॅन कार्डबाबत संभ्रम निर्माण करणारे फोन, एसएमएस, लिंक, ई-मेल करुन फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे त्यापासून सावध राहणे आवश्यक आहे.
आयकर रिटर्न फाईल करताना तुम्हाला पॅन कार्डची विचारणा होते. तसेच अनेक आर्थिक बाबीमध्ये पॅन कार्डची मागणी केली जाते. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक यांना पॅन कार्ड सातत्याने लागत असते. अशा पॅन कार्ड २.० ची घोषणा झाल्याने त्याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
त्यातून सायबर चोरटे आयकर खात्याच्या सारखेच ई-मेल, एसएमएस करुन लोकांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. फोन करुन नवीन पॅन कार्ड घेणे बंधनकारक आहे. नवीन कार्ड घेतले नाही तर तुमचे खाते बंद होईल अशी भिती घालण्याची शक्यता आहे. नव्या पॅन कार्डसाठी लिंक पाठवून त्यावर क्लिक करायचा सांगून फसवणूक करण्याची शक्यता आहे.
*नवे पॅन कार्ड घेणे सर्वांच्या हिताचे असले तरी जुने कार्ड बंद होणार नाही.
- नवे पॅन कार्ड घेणे बंधनकारक नाही.
- पॅन कार्ड बाबत लिंक, फोन, एसएमएस आल्यास ते सायबर चोरट्यांचेच आहेत, असे गृहित धरुन सावधगिरी बाळगा.
*नवीन पॅन कार्ड हवे असल्यास अगोदर कोणत्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे, याची व्यवस्थित माहिती घ्या. - पॅन कार्डबाबत कोणाचा फोन आल्यास आपल्या करसल्लागाराशी बोलून कळवितो, असे उत्तर द्या.
- तरीही चुकून आपल्या हातून चुक झालीच तर तत्काळ सायबर क्राईम च्या https://cybercrime.gov.in वेबसाईटवर तक्रार करा. किंवा १९३० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.
